राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा “या” 12 जागांसाठी आग्रह ?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा “या” 12 जागांसाठी आग्रह ?

लोकसभा निवडणुकीचं बिगुल पुढच्या महिन्यात वाजणार असलं तरी महायुती आणि इंडिया आघाडी याचं जागावाटपाच्या चर्चेचं गु-हाळ अजून सुरूच आहे. दोन्ही आघाडींच्या वेगेवगळ्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू असली तर महाराष्ट्र डीएनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 10 ते 12 जागांसाठी आग्रही असल्याची बातमी समोर येत आहे. या 12 जागांवर त्यांचे उमेदवारांची नावेही तयार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रही असलेल्या जागांमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरुर, सातारा, माढा, रायगड, धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली हे ते 9 मतदारसंघ आहेत. यापैकी माढा आणि गडचिरोली या दोन मदारसंघात सध्या भाजपचे खासदार आहेत. पण आपल्याकडे या दोन्ही मतदारसंघात तगडे उमेदवार असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. या 9 मतदारसंघापैकी अन्य तीन मतदारसंघाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती कळते आहे.
बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी तयारी सुरू केली आहे. माढा मतदारसंघातून फलटण किंवा करमाळ्यातील उमेदवार उतरवला जाण्याची शक्यता आहे. शिरुरमधून शिंदे गटात असलेला उमेदवार राष्ट्रवादीत घेऊन त्याला उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. साता-यातून वाईचा उमेदवार दिला जाईल अशी चर्चा आहे. रायगडमधून सुनिल तटकरे, परभणीतून राजेश विटेकर, गडचिरोलीतून धर्मराव बाबा अत्राम यांच्या नावाची चर्चा आहे. तर धाराशिवमधून सध्या शरद पवार गटात असलेल्या एका नेत्याला गळाला लावण्याची प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
अजित पवार गटाला 12 जागा दिल्यास शिंदे गटाकडूनही तशाच जागा मागितल्या जाऊ शकतात. तसं झाल्यास भाजपला केवळ 24 जागांवर आपले उमेदवार उभे करावे लागतील. मग इतर मित्र पक्षांचं काय असा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा 12 जागांचा आग्रह भाजप कितपत मान्य करणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

COMMENTS