छत्रपती संभाजीराजे यांनी आपण लोकसभेच्या आखाड्यात उतरणार याचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले आहेत. त्यातच आता त्यांना महाविकास आघाडीने ऑफर दिल्याची माहिती पुढे आली आहे. पण महाविकास आघआडीने त्यांना कोणत्यातरी पक्षात प्रवेश करुन त्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफिर दिली आहे. तशा बातम्याही काही माध्यमांमधून आल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संभाजीराजे यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. तशी गळ त्यांना मविआच्या नेत्यांनी घातली आहे अशी माहिती सूत्रांकडून कळत आहे.
संभाजीराजे यांनी आपण मविआकडून लोकसभा निवडणूक लढवू इच्छितो आहे. मात्र आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही तर आपल्या स्वराज्य पक्षाकडूनच निवडणूक लढणार आहोत असं ट्विट केलं आहे. आपण मविआचा घटक पक्ष होऊ शकतो मात्र त्यांच्या तिकीटावर निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. थोडक्यात मविआची तीन्ही पैकी कोणत्यातरी राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर संभाजीराजे यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता मविआ त्यांना घटक पक्ष म्हणून सोडते की नाही ते पहावं लागेल.
स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे #स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे. #LokSabha2024
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 1, 2024
संभाजीराजेंसाठी मविआ का आग्रही आहे ?
कोल्हापुरातून तिन्ही पक्षांकडे तसे उमेदवारांची कमतरता नाही. मात्र संभाजीराजांना तिकीट दिल्यास एक तर राजघराणे आपल्यासोबत असल्याचा काही प्रमाणात फायदा मविआला होऊ शकतो. त्याचबरोबर संभाजीराजे हे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी फिरले आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात त्यांचा फायदा मविआच्या उमेदवारांना होऊ शकतो. त्यामुळे संभाजीराजेंना आपल्याकडे वळवण्यासाठी मविआ नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे. आता संभाजीराजे मविआ नेत्यांची अट मानतात की मविआ नेते संभाजीराजे यांनी अट मानतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS