धाराशिव : बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्याने धाराशिव लोकसभा निवडणूक रंगली.
महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून (अजित पवार गट) अर्चना राणा पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना त्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी दोन्हीही उमेदवाराकडून गावागावात प्रचार सभा घेतल्या जात आहेत. एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप केले जात आहेत. याच दरम्यान काही वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. राजकारणातील ही वक्तव्य सामान्य मतदारांचा चर्चेचा विषय ठरत आहे.
—–
अर्चना पाटील या तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी होत. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. त्यांच्या या कामाचा अनुभव जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच जिल्ह्यातील नागरिकांना आहे. तशा अर्चना पाटील या सरळ स्वभावाच्या आहेत. त्यांच्या मनामध्ये कोणतीही आकड नसते. जे आहे, जे वाटतं ते सत्य बोलणारे व्यक्तिमत्व होय. मात्र म्हणतात ना राजकारणात कधीकधी सर्वच सत्य सांगणे चुकीचे ठरते. असाच काहीसा अनुभव त्यांना आठ दिवसात आला आहे. बार्शी येथे एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर पाटील यांनी त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्या म्हणाल्या मला राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रश्न येत नाही. वास्तविक संबंधित पत्रकाराने विचारलेला प्रश्न आणि त्यांनी दिलेलं उत्तर हे संयुक्तिक होतं. बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत आहेत. भविष्यात विधानसभेच्या निवडणूका स्वतंत्र लढवल्या तर काय होईल. असा तो प्रश्न होता. आणि त्याच प्रश्नावर पाटील गोंधळून गेल्या. त्याच वेळी उपस्थित पत्रकारांनी तो मुद्दा पुढे करत बातम्या चालवल्या. इतर सर्व माध्यमानी त्यांचे ते वक्तव्य बातमी म्हणून वापरले. अर्चना पाटील यांचा तसा उद्देश नसावाही, किंबहुना नव्हता. परंतु प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या नुकसानीचे ठरल्याची चर्चा आहे. साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या विषयी नाराजी व्यक्त झाली. त्यामुळे राजकारणात कधीकधी सरळपणाने वक्तव्य करणं हे चुकीचे ठरतं. याचाच प्रत्यय उमेदवार अर्चना पाटील यांना आला असावा. त्याच्या त्या वक्तव्याचा विरोधकांकडून फायदा घेण्यात आला. साहजिकच विरोधक अशी संधी सोडणार नाहीत.
—–
अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचेही वक्तव्य चांगलंच रंगतदार ठरल आहे. 2019 मध्ये अजित पवार यांनी आम्हास भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. आता ते आले आहेत. या पाटील यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अशा वक्तव्याने नाराजी असल्याची चर्चा आहे. मल्हार पाटील हे सोडततोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या आजोबाप्रमाणे (डॉ. पद्मसिंह पाटील) त्यांची कामाची पद्धती आहे. बेधडकपणे कामात आणि बोलण्यात स्वतःचे कौशल्य ते नेहमीच दाखवून देतात. मात्र अशी वक्तव्य खरोखरच राजकारणात चालतात का? त्याचा किती फायदा होतो? याचं गणित सध्याच्या निवडणुकीत मांडलं जाणार आहे.
—–
पालकमंत्री तानाजी सावंत यांचेही ओमराजे यांच्या विरोधातील वक्तव्य चांगले चर्चेत आलं होतं. त्या वक्तव्यावरून राजकारणातील काही कार्यकर्त्यांना चांगलाच गुदगुल्या झाल्या. तर ओमराजे समर्थकानी त्या विधानाचा निषेध केला. नाराजी व्यक्त केली. तानाजी सावंत हे आपल्या बेधडक स्वभावाने प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी ओमराजेवर आरोप करीत घेतलेला समाचार आगामी निवडणुकीत किती फायदेशीर ठरनार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र बेधडक वक्तव्य करून ही निवडणूक गाजणार अशी चर्चा सध्या धाराशिवच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
——
COMMENTS