धाराशिव : निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित; कर्मचारी वर्गात खळबळ
निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बसे यांनी हे आदेश दिले आहेत.
लोकसभेची निवडणूक सुरळीत पार पाडवी यासाठी पोलीस यंत्रणेसह महसूल प्रशासन सज्ज झाला आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दिले जाऊ नये. पैशाचा वापर होऊ नये. यासाठी निवडणूक विभागाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक मार्गावर चेक पोस्ट लावून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. वाहनातून पैशाचा वापर होऊ, त्यासाठी असे पाउल उचलले जात आहे. प्रत्येक ठिकाणी नाक्यावर निवडणूक विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे चेक पोस्ट लावण्यात आला आहे. या ठिकाणी कृषी विभागातील वरिष्ठ लिपिक एस एस सोलंकर तसेच ग्रामसेवक डी डी कांबळे यांना नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यांनी त्यांच्या कामात वारंवार हलगर्जीपणा केला. चेक पोस्ट नाक्यावर थांबण्याच्या ऐवजी इतरत्र थांबले. पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत आढावा घेतला. संबंधित कर्मचारी हे नेमून दिलेल्या ठिकाणी, चेक पोस्ट नाक्यावर थांबत नसल्याचं अहवालात आढळून आले. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात तसा अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबाबत आदेश काढून दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान निवडणुकीच्या कामातील हलगर्जीपणा या कर्मचाऱ्यांना भोवल्याने कर्मचारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे. कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना यापुढेही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांची कामे सुरळीतपणे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबसे यांनी केले आहे.
-––
COMMENTS