धाराशिव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दमबाजीनेच आम्हाला तेरणा साखर कारखाना मिळाला, असल्याची कबुली आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी दिली आहे. तालुक्यातील ढोकी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी याबाबत जाहीर वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांची दमबाजी कामाला आल्याचं सांगितलं आहे.
तेरना सहकारी साखर कारखाना नेहमीच राजकारणाचे केंद्रबिंदू बनला आहे. मात्र गेली बारा वर्षे कारखाना बंद अवस्थेत पडला होता. त्या दरम्यान कारखाना सुरू करण्याच्या हालचाली वारंवार झाल्या. मात्र त्यात फारसं यश आलं नाही. अखेर गेल्यावर्षी कारखाना सुरू करण्याच्या संदर्भात बँकेने निविदा काढली. यामध्ये सावंत यांचा भैरवनाथ शुगर मिल हा समूह तसेच लातूर येथील देशमुख परिवाराकडून ही कारखाना चालवण्यासंदर्भात अर्ज दाखल झाले. यामध्ये मोठे महानाट्य घडले. जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व सावंत गटाचे आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने याबाबतचा निकाल येणे अपेक्षित असल्याचं बोललं जात होतं. मात्र यामध्ये तांत्रिक गडबड झाल्याचं कारण पुढे करीत याबाबतचा वाद विविध न्यायालयात गेला. अखेर सावंत यांच्या बाजूनेच निकाल लागला आणि कारखाना त्यांच्या भैरवनाथ शुगर परिवाराकडे गेला. दरम्यान हे महानाट्य कसं घडलं, याबाबतचा जाहीर खुलासाच सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत उलगडून दाखवला. मुख्यमंत्री शिंदे यांनी देशमुख परिवाराला मुंबईला बोलावलं. आणि म्हणाले, “तुमच्यात बोट कोण घालतय, याचं मला देणे-घेणे नाही. तानाजीराव सावंत यांना कारखानदारीच्या संदर्भातला अनुभव आहे. त्या रस्त्यात पाय टाकायचा नाही. आणि हाच एक ‘दम’ लागू पडला. तीन दिवसात सर्व न्यायालयातील केसेस मागे घेण्यात आल्या. तुमच्या एका दमाने कारखाना ताब्यात मिळाला ही फक्त एकनाथ शिंदेंचीच कृपा असल्याची जाहीर कबुली यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांची दमबाजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनण्याचे संकेत आहेत. अर्थात तेरणा कारखाना सुरू झाला असला तरी शेतकऱ्यांना यातून फायदा कितपत होणार? मुख्यमंत्र्यांची दमबाजी खरोखरच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार का? हे आगामी काळात दिसून येणार आहे.
—
COMMENTS